जनाची नाही तरी मनाची तर ठेवा!


-फहीम खान

एकेकाळी समाजात आपले विचार मांडण्यासाठी चौक, बाजारपेठ, सभागृह किंवा कार्यालये हीच प्रमुख व्यासपीठे होती. आजच्या डिजिटल युगात ही जागा सोशल मीडियाने घेतली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, एक्स आणि इतर माध्यमांमुळे प्रत्येकाला स्वतःचे मत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने सकारात्मक असली, तरी प्रसिद्धीच्या हव्यासाने या स्वातंत्र्याचा गैरवापरही वाढताना दिसत आहे.


आज सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अक्षरशः स्पर्धा लागली आहे. अधिक व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी अनेकजण कोणत्याही थराला जात आहेत. विनोदाच्या नावाखाली व्यक्ती, समाज, धर्म किंवा महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत. काही क्षणांच्या प्रसिद्धीसाठी संवेदनशीलता, सभ्यता आणि सामाजिक जबाबदारी यांचा बळी दिला जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अशा गोष्टींना काहीजण मनोरंजनाचे स्वरूप देतात.


अलीकडेच गुरगावमधील एका तरुणाची घटना याच वास्तवाची जाणीव करून देते. स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या एका कार्यक्रमात 23 वर्षीय हिमांशु जांग्राने एका मुलीबाबत केलेले वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही तासांतच त्याच्यावर टीकेची झोड उठली. लोकांनी त्याच्या वक्तव्याचा निषेध केला आणि अखेरीस ज्या कंपनीत तो काम करत होता, त्या कंपनीने त्याची सेवा समाप्त केली. एका क्षणाच्या अविचारी वक्तव्यामुळे त्याची प्रतिमा, नोकरी आणि भविष्यातील अनेक संधी धोक्यात आल्या.


ही घटना केवळ एका व्यक्तीची चूक म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. हा आपल्या समाजाच्या मानसिकतेचा आरसा आहे. स्त्री म्हणजे विनोदाचा विषय नाही. ती एक व्यक्ती आहे, एक स्वतंत्र अस्तित्व आहे. महिलांना समानतेचा अधिकार देणे म्हणजे फक्त त्यांना स्वातंत्र्य देणे नव्हे, तर त्यांचा सन्मान राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा विनोदाच्या नावाखाली महिलांचा अपमान केला जातो, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण समाजातील स्त्रीवर्गाचा अवमान ठरतो.


हसणे आणि विनोद करणे जीवनासाठी आवश्यक आहे. पण कोणाच्या सन्मानाची किंमत मोजून मिळणारे हास्य हे खरे मनोरंजन असू शकत नाही. सोशल मीडिया हे आभासी जग असले तरी त्याचे परिणाम वास्तव आयुष्यावर होतात. एक पोस्ट, एक व्हिडिओ किंवा एक वक्तव्य अनेकांचे आयुष्य बदलू शकते. त्यामुळे बोलण्यापूर्वी आणि पोस्ट करण्यापूर्वी विचार करणे आज काळाची गरज बनली आहे. प्रसिद्धी मिळवणे चुकीचे नाही, पण ती मिळवण्याचा मार्ग योग्य असायला हवा. काही क्षणांच्या टाळ्यांपेक्षा आयुष्यभराचा सन्मान अधिक मौल्यवान असतो. म्हणूनच प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा – प्रसिद्ध होण्यापेक्षा चांगला माणूस होणे अधिक महत्त्वाचे नाही का?


लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या या शर्यतीत एक गोष्ट विसरून चालणार नाही स्क्रीनच्या पलीकडेही माणसे आहेत, त्यांच्या भावना आहेत, त्यांचा सन्मान आहे. काही क्षणांच्या प्रसिद्धीसाठी तो सन्मान तुडवला जात असेल, तर ती प्रगती नव्हे तर अधोगती आहे. म्हणूनच जनाची नाही तरी मनाची तरी ठेवूया; कारण शहाणपणाने प्रसिद्ध होणे ही कला आहे, पण माणुसकी जपणे हेच खरे मोठेपण आहे.


- फहीम खान, सीनियर जर्नलिस्ट, नागपुर 
8483879505 

Comments

Popular posts from this blog

मोहब्बत… जो खत्म नहीं होती

शेयर मार्केट में कम रिस्क के साथ अच्छा रिटर्न कैसे पाएं

लाख टके की बात : 102 साल के विश्वविद्यालय को आखिर क्यों नहीं मिल रहा कप्तान?